कोल्हापूर - काहीच लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या देखरेखीखाली घरी स्वतंत्र उपचार केले जाणार असल्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हा निर्णय घेतला आहे. संबंधित रुग्णांच्या घरात सर्व प्रकारच्या व्यवस्था असाव्या, असे त्यांनी सांगितले. सध्या दोन रुग्णांवर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात सध्या 500हून अधिक बाधित रुग्ण आहेत. रुग्णसंख्या याच वेगाने वाढल्यास रुग्णांच्या घरी स्वतंत्र व्यवस्था करून रुग्णालयाच्या माध्यमातून होम क्वारंन्टाइन करून घरीच उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी परिसरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडे संबंधित जबाबदारी देण्यात येणार आहे.