कोल्हापूर -एकीकडे प्रकाश आंबेडकर म्हणतात केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करण्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मग आता राज्याच्या हातात काय आहे? उलट आम्हीच संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत, त्यात कसला ट्रॅप असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश यांनी संभाजीराजेंना नुकताच एक सल्ला देत त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःची सत्ता आणावी शिवाय मुख्यमंत्री आणि त्यांची भेट हा एक ट्रॅप आहे, त्यामध्ये त्यांनी पडू नये असेही म्हटले होते. यावर मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत प्रकाश आंबेडकरांना कसला ट्रॅप असा उलट सवाल केला आहे. ते कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटले आहे ? -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नामदार अशोक चव्हाण आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समाजातील समन्वयकांशी गुरूवारी मुंबई येथे बैठक पार पडली. यामध्ये संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या काही मागण्या सरकार समोर ठेवल्या होत्या. त्यांच्या या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजेंसाठी हा ट्रॅप होता त्यांनी यात अडकू नये असा सल्ला दिला आहे. शिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न कोणताही राजकीय पक्ष सोडवणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजेंना स्वतःची सत्ता स्थापन करावी लागेल. स्वतःची सत्ता आली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, अन्यथा हा प्रश्न सुटणे कठीण आहे. त्यासाठी संभाजीराजेंनी आपली सत्ता कशी स्थापन करावी हे पाहावे असे म्हणत, सरकारच्या या ट्रॅपमध्ये अडकू नये असेही म्हटले होते. त्यावर मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.