कोल्हापूर -खासगी रुग्णालयांकडून लूट होत असेल तर, तक्रार करण्यासाठी पुढे या, आपण त्यांच्यावर कारवाई करू,असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. आतापर्यंत ज्या हॉस्पिटलच्या तक्रारी आल्या आहेत,अशा हॉस्पिटलवर कारवाई केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील रस्त्यांसाठी तसेच पॅचवर्कच्या कामासाठी ४० कोटींपर्यंतचा निधी मंजूर असून रस्ते दुरुस्तीच्या कामांना आता वेग येणार आहे. म्हणूनच येत्या दिवाळीपूर्वी शहरातील सर्व रस्ते चकाचक होतील, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा -पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कॅंडल मार्च; हाथरस येथील बलात्काराचा जोरदार निषेधार्थ
पाटील म्हणाले, शहरातील रस्ते व्यवस्थित करण्याबरोबरच महत्त्वाचे विषय तातडीने मार्गी लावले जाणार आहेत. कचरा प्रकल्पाअंतर्गत सध्या २०० टन कचरा निर्गतीकरण होत आहे. यामध्ये आणखी ५० टनाची वाढ केली जाईल. त्यासाठी राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीमार्फत ४५ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. शहरात बिंदू चौक, गाडी अड्डा तसेच, तावडे हॉटेल परिसरात वाहन पार्किंग तळ करणार आहे. सोलापूरच्या धर्तीवर स्मशानभूमीत इलेट्रिक दाहिनीचा विचार केला आहे. थेट पाइपलाइनचे ४९ किमीचे काम पूर्ण झाले असून राफ्टचे काम ७० टक्के, जॅकवेलचे कामही पूर्ण झाले आहे. अन्य कामेही पाऊस आणि कोरोनामुळे प्रलंबित होती ती फेब्रुवारीपासून वेगाने पूर्ण होतील. शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत कामेही ४५ टक्के पूर्ण झाली आहेत. आयटी पार्कसाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यासाठी जागाही आरक्षित केली जाणार आहे. तर, शहरातील आवश्यक ठिकाणी सिग्नल उभारणी केली जाणार आहे.
मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
कोरोनामुळे महापालिकेच्या १० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६ जणांच्या कुटुंबीयांना केंद्र शासनाच्या विमा योजनेतून मदत झाली आहे. अन्य चार जणांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, अशी माहितीही मंत्री पाटील यांनी दिली.
शहरात आणखी एक दवाखाना :
महापालिकेची प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मदतीने लवकरच एक दवाखाना उभारणीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी २ ते ४ कोटी खर्च अपेक्षित असून शहराची आरोग्ययंत्रणा सक्षम होण्यासाठी दवाखाना उभारणीचे काम वेगाने करण्याचा मानस असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा -हाथरसची घटना देशातील लोकशाहीला काळिमा फासणारी - छगन भुजबळ