कोल्हापूर- दूध खरेदी दरामध्ये आता राज्यातील सर्वात मोठ्या दूध संघातसुद्धा कपात झाली आहे. गोकुळच्या गायी दूध दरामध्ये 1 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. याबाबतचे जिल्ह्यातील सर्वच दूध संस्थांना पत्र पाठवण्यात आले आहेत. गायीच्या दुधामध्ये प्रति लिटर एक रुपयाने कपात करण्याचा गोकुळच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. २१ जुलैपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
गोकुळच्या गाय दूध खरेदी दरात 1 रुपयांची कपात - gokul cow milk news
बाजारपेठेत दूध पावडर आणि लोणी दर घसरल्यामुळे दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे गोकुळने संस्थांना पाठवलेल्या पत्रांमध्ये म्हटले आहे.
बाजारपेठेत दूध पावडर आणि लोणी दर घसरल्यामुळे दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे गोकुळने संस्थांना पाठवलेल्या पत्रांमध्ये म्हटले आहे. दरम्यान, गोकुळमध्ये दररोज सुमारे 5 लाख 50 हजार लिटर गायीचे दूध संकलन होत असते. सद्या गोकुळचा गाय दूध खरेदी दर 27 रुपये इतका असून, विक्री दर 44 रुपये इतका आहे. तसेच मुंबईमध्ये तर तो दर 48 रुपये इतका आहे.
सद्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात दूध पावडरचे दर कोसळल्याचे नेहमीचे कारण सांगून गोकुळने 21 जुलै पासून गाय दूध खरेदीचा 27 रुपये असणारा दर 1 रुपयांनी कमी करुन, 26 रुपये करण्याचे जाहीर केले आहे. गायीच्या दूध खरेदी दरात 1 रुपयेची कपात करण्याचा निर्णय दुर्देवी असून, जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान करणारा हा निर्णय असल्याचे दूध उत्पादकांनी म्हटले आहे. गोकूळ बचाव समितीने तर ही कपात रद्द करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.