महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशेष: कोल्हापूरात यंदा गणेशोत्सव होणार 'आरोग्य उत्सव'; सार्वजनिक मंडळांचा निर्णय - कोल्हापूर जिल्हा बातमी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूरातील अनेक सार्वजनिक तरुण मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव हा 'आरोग्यत्सव' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ganesh festival at kolhapur
कोल्हापूर गणेशोत्सव

By

Published : Jul 9, 2020, 4:44 PM IST

कोल्हापूर - दरवर्षी कोल्हापूरात साजरा होणारा गणेशोत्सव राज्यात लक्षवेधी ठरत असतो. अनेक सामाजिक उपक्रम राबवत येथील सार्वजनिक मंडळे राज्यात आदर्श निर्माण करतात. गणेशोत्सव काळात कोल्हापूरात सर्वात चर्चेचा विषय ठरते ती म्हणजे विसर्जन मिरवणूक. तब्बल ३६ तास चालणारी ही मिरववणूक, गणेश भक्तांना उत्साह देऊन जाते. मात्र, यंदा कोरोनाने या उत्साहावर पाणी फिरवले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूरातील अनेक सार्वजनिक तरुण मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव हा 'आरोग्यत्सव' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूरात यंदा गणेशोत्सव होणार 'आरोग्य उत्सव'...

हेही वाचा -कोरोना, लॉकडाऊनवर मात करुन पेणचे बाप्पा निघाले फॉरेनला . . .

कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला देखील एक वेगळी परंपरा आहे. विशेषतः पेठा-पेठांमधील मंडळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवात विधायक उपक्रमांत बरोबरच जंगी विसर्जन मिरवणूक यांचे परंपरा देखील इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जपली आहे. उत्सव आणि मिरवणुकांमध्ये आधुनिक बाज जरूर आला पण उत्साह मात्र तोच आहे. यावर्षी देखील गणेशोत्सवासाठी विविध संकल्पना इथल्या तरुणाईकडे होत्या. यावर काम देखील जवळपास पूर्ण झाले होते. मात्र, देशात आणि राज्यात कोरोना संकट आले तसे या तयारीवर मर्यादा येत गेल्या आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करत आरोग्य विधायक उपक्रम राबवणार असल्याचं मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.

दरवर्षी आनंदाच्या वातावरणात गणेश उत्सव हा सण साजरा केला जातो. पण कोरोना आल्याने सगळ्यांनाच आपली हौसमौज बाजूला ठेवून प्रशासनाचे नियम पाळत हा सण साजरा करावयाचा आहे, असा निर्णय देखील गणेश मंडळांनी केला आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला. शहरातील देखील काही भाग पाण्याखाली गेल्यामुळे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागला होता. परिणामी यावेळी मागची कसर भरून काढत गणेश उत्सव साजरा करायच्या तयारीत असलेल्या कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर कोरोनाने विरजण पाडले आहे.

हेही वाचा -'ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांनीही राज्य सरकारच्या निर्णयाला सहकार्य करावे'

ABOUT THE AUTHOR

...view details