कोल्हापूर - आज दुपारी कोल्हापुरातील संभाजीनगर येथे महानगरपालिकेच्या चार चाकी गाडीच्या ( Kolhapur Municiple Corporation Vehicle Accident ) धडकेत तन्वी विकास कांबळे या 4 वर्षीय बालिकेचा ( Kolhapur 4 Year Old Girl Death ) मृत्यू झाला आहे. यावेळी संतप्त झालेल्या लोकांनी महानगरपालिकेच्या गाडीच्या काचा फोडत गाडीची तोडफोड केली आहे. माहिती कळताच घटनास्थळावर जुना राजवाडा पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
महानगरपालिकेच्या गाडीची लागली धडक -
शहरातील मूळचे वारे वसाहत येथील रहिवाशी विकास कांबळे हे गेल्या काही वर्षांपासून रायगड कॉलनीमधील सरनाईकनगरमध्ये कुटुंबियांसह राहतात. रविवारी दुपारी विकास कांबळे हे त्यांच्या ४ वर्षांची मुलगी तन्वीला घेऊन वारे वसाहतीत कामानिमित्ताने आले होते. काम संपल्यावर तिथून ते कुटुंबियांना भेटून मोटरसायकलवरून सरनाईकनगरकडे जात होते. यावेळी ते संभाजीनगर येथील संदीप गॅस एजन्सीसमोर आले असता विकास कांबळे यांच्या मोटरसायकलची मागून येत असलेल्या महानगरपालिकेच्या चारचाकी गाडीला धडक झाली आणि या धडकेत विकास कांबळे आणि मुलगी तन्वी हे दोघेही महापालिकेच्या चारचाकी खाली आल्याने गंभीर जखमी झाले.