कोल्हापूर - गेल्या सात दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टीच्या ( Former MP Raju Shetty ) नेतृत्वात कोल्हापूरच्या महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याचा निर्णय झाला नाही तर 4 मार्चपासून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. सात दिवसात दोन मंत्री, दोन आमदारांनी आंदोलनाला भेट दिली. मात्र, शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. यापुढे मंत्री, आमदारांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणार, असा इशाराही त्यांनी दिला.
तर काही अनुचित प्रकार घडल्यास यास राजू शेट्टी जबाबदार असतील असे नितीन राऊत यांनी आज अकोल्यात बोलले होते. त्याला प्रतिउत्तर देत राजू शेट्टी यांनी ऊर्जा मंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकूनच बघावी, विजेच्या वाढीव दरांची जबाबदारी त्यांच्यावर टाकेन, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला आहे.
मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच -शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी राजू शेट्टी कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. दरम्यान, या सात दिवसात 2 आमदार आणि 2 मंत्री राजू शेट्टी यांची भेट घेतली. मात्र, ठोस निर्णय काय आलेला नाही. आज (दि. 28 फेब्रुवारी) राजू शेट्टी यांनी आंदोलनाची पुढची दिशा कशी असावी याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. जोपर्यंत दिवसा वीज देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.