कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील वाघबिळ येथील एकलव्य कोरोना केअर सेंटरमध्ये विनामास्क फूटबॉल खेळणाऱ्या सहा कोरोनाबाधितांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एकलव्य कोरोना केअर सेंटरचे समन्वय अधिकारी प्रविण राव यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
संबंधित सहा जणांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे, हे माहीत असताना सुध्दा जमाव करुन तोंडास कोणत्याही प्रकारचे कापड अगर मास्क न लावता पोर्ले विरुध्द कोतोली असे टीमला नाव देवून फूटबॉल खेळ खेळला.
हेही वाचा -राज्यात प्रथमच पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त, ८ हजार ७०६ कोरोनामुक्त
कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवले जाते. जिल्ह्यात कोरोनाच्या संदर्भात लागू असलेल्या विविध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत संचारबंदी चालू असताना संबंधितांनी फुटबॉल खेळ खेळल्याने त्यांच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा नोंद झाल्यानंतर परिसरात अनेक उलट सुलट चर्चा सुरू होत्या.