कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत आज सुद्धा सकाळपासून मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Kolhapur ) सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सध्याची पाणीपातळी 35.5 फुटांवर पोहोचली असून इशारा पातळी गाठायला केवळ साडे तीन फूट बाकी आहे. जिल्ह्यात पंचगंगा नदीची ( Flood of Panchganga river ) इशारा पातळी 39 फूट आहे आणि 43 फूट धोका पातळी आहे. त्यामुळे असाच पाऊस सुरू राहिल्यावर इशारा जवळपास 12 तास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सावधानतेचा इशारा - दरम्यान, कोल्हापूरात 15 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुरस्थिती पुन्हा एकदा निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यानुसार आत्तापासूनच प्रशासनाने काळजी घेतली असून नागरिकांना सुरक्षीतस्थळी स्थलांतर होण्यासाठी सूचना दिल्या आहेत. कोणत्याही क्षणी पंचगंगा इशारा पातळी गाठू शकते त्यामुळे सर्वांनी प्रशासनाच्या प्रत्येक सुचनांकडे लक्ष द्या असेही सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे राधानगरी धरण सध्या केवळ 55 टक्के भरले आहे. त्यामुळे नेहमीच राधानगरी धरणातील जो विसर्ग होत असतो त्यावर पूरस्थिती अधिक गंभीर बनत असते. मात्र सध्या धरणच अध्याप भरले नसल्याने हा एक दिलासा मानला जात आहे.
राधानगरी 55 टक्के भरले -कोल्हापूरमधील राधानगर हे धरण सध्या 55 टक्के भरले आहे. स्वयंचलित दरवाजे असलेले हे राज्यातील एकमेव धरण आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरायला लागल्यावर या धरणाचे दरवाजे उघडले जातात आणि पाणी पुढे नदीपात्रात सोडले जाते. सध्या हे धरण पूर्णतः भरलेले नसल्याने परिस्थिती गंभीर नाही. मात्र असाच सातत्याने मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास धरण लवकर भरू शकते. राधानगरी धरणातून जो पाण्याचा विसर्ग होतो त्यावरच पुढे पुराची स्थिती गंभीर होत जाते.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -दोन आठवडे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी वर्षा सहलीला, ट्रेकिंगला जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. सद्यस्थितीत भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील धबधबे व अन्य वर्षा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. याच कालावधीत जिल्ह्यातील बऱ्याच संघटना पन्हाळा ते पावनखिंड -विशाळगड अशा मार्गावर जंगल सफर आणि ट्रेकिंगच्या मोहिमा आयोजित करत आहेत. अशा स्वरुपाच्या मोहिमा, ट्रेकिंग मध्ये सहभाग घेत असताना अतिवृष्टीमुळे या मार्गावर दरड कोसळणे किंवा पूरस्थिती निर्माण होणे अशा स्वरूपाच्या घटना घडू शकतात. यामुळे अतिवृष्टी कालावधीत अशा स्वरूपाच्या मोहिमा आयोजित करू नयेत आणि यामध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.