कोल्हापूर -जयप्रभा स्टुडिओ शुटींगसाठी खुल झालाच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या 94 दिवसांपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलाकारांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. मात्र याची दखल अद्यापही घेतली नसल्याने आता चित्रपट महामंडळाचे कलाकार ( Film Corporation Actors ) आक्रमक झाले असून आजपासून ( बुधवारी ) कोल्हापूर शहरात आंदोलनाचा धडाका सुरु करण्यात आला आहे. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलनाने ( Agitation at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Kolhapur ) करण्यात आली आहे. जयप्रभा स्टुडिओसाठी ( Jayaprabha Studio ) वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन होणार असून वेळप्रसंगी सामूहिक आत्मदहन करु, असा इशारा चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिला आहे.
अनेक नेत्यांची भेट मात्र दखल नाही :जयप्रभा स्टुडिओची जागा ही २ वर्षापूर्वीच विक्री झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूरकर आणि कलाकार आक्रमक झाले आहेत. ही जागा श्री महालक्ष्मी स्टुडिओज एलएलपी या कंपनीच्या दहा भागीदाराणी खरेदी केली. यामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची दोन मुले ऋतुराज राजेश क्षीरसागर आणि पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्यासह ८ जणांचा समावेश आहे. दरम्यान तब्बल ७७ दिवसांनी राजेश क्षीरसागर यांनी या स्टुडिओस आणि आंदोलकांना भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी जय प्रभा स्टुडिओ परिसराची पाहणी करत आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम होते. जोपर्यंत स्टुडिओ ताब्यात मिळत नाही किंवा ठोस निर्णय होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन केले. काळे फलक हातात घेत कलाकार निदर्शने करण्यात आले. रोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
असे असणार पुढील आंदोलन :गेल्या 94 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारने व महापालिकेने आंदोलकांना तोंडी आश्वासनाशिवाय काहीही दिले नसल्याने आक्रमक झालेल्या कलाकारांनी रोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचे ठरवले आहे. दिनांक 18 ते 21 मे दरम्यान शहरातील विविध भागात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 22 मे रोजी पंचगंगा घाट येथे पंचगंगा नदीत अर्धनग्न आंदोलन करणार आहे. दिनांक 23 मे रोजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात येणार आहे. तर 24 मे ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे.