कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय भोजे यांनी जिल्हा परिषदेतील एका महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे. स्वतः महिला अधिकाऱ्यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भोजे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही खोटी तक्रार आहे आणि आम्ही भोजे यांच्या पाठीशी असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.
तक्रारीत काय म्हंटले आहे?
कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन पक्ष प्रतोद आणि विद्यमान विरोधी पक्षनेते विजय भोजे यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये माझ्याकडे दिवाळी भेटची मागणी केली. शिवाय ती कुठे आणून देऊ असा मेसेज केला. त्यानुसार त्यांनी 20 ऑक्टोबर 2019 रोजी मला फोन करून आपल्या घरी बोलवले. त्यांनी दिवाळीसाठीच घरी बोलावले असेल असे समजून मी माझ्या मुलीला घेऊन त्यांच्या घरी गेले असता तो अर्धनग्न अवस्थेत बसला होता. शिवाय माझ्याकडे अश्लील नजरेने पाहून मला पैसे नकोत म्हणून माझा हात धरला. त्यामुळे मी घाबरून आपल्या घरी परतले. त्यानंतर त्याच रात्री त्यांनी माझ्या मोबाईलवर फोन करून अश्लील मेसेज केल्याबाबत तक्रारीत म्हंटले आहे. शिवाय याबाबत मी तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना याबाबत माहिती दिली होती. मात्र त्यांनी समजूत काढल्याने मी तक्रार दिली नव्हती. मात्र, भोजे यांनी आजअखेर मला कुस्ती मॅटच्या प्रकरणावरून त्रास देऊन माझ्याकडे वारंवार अश्लील हेतूने बघून मला मानसिक त्रास दिला असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. त्यानुसार भोजे यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.