कोल्हापूर -शहरातील एका माजी सैनिकाने डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. येथील कळंबा परिसरातील जिवबा नाना जाधव पार्क येथे ही घटना घडली. दिनकर पांडुरंग मगदूम (वय ४५ ) असे मृत माजी सैनिकाचे नाव असून करवीर पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत दिनकर मगदूम हे माजी सैनिक होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी कात्यायनी परिसरात विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. गेल्या चार महिन्यांपासून घरगुती कारणास्तव त्यांची पत्नी सविता, मुलगा सौरभ आणि मुलगी वैष्णवीसोबत त्यांच्या माहेरी पाचगाव येथे राहत होते. गुरुवारी रात्री उशिरा दिनकर मगदूम यांनी आपण आत्महत्या करणार असल्याची माहिती, त्यांच्या एका जवळच्या मित्राला फोनवरून कळवली होती. ही माहिती त्या मित्राने मगदूम यांची पत्नी व मुलगा सौरभ याला फोनवरून सांगितली. त्यानंतर मुलगा सौरभ व नातेवाइकांनी जिवबा नाना पार्क येथील घरामध्ये धाव घेतली. त्यावेळी दिनकर मगदूम बेशुद्धावस्थेत पडलेले त्यांना दिसून आले. त्यांनी मगदूम यांना तत्काळ कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयासह कोल्हापुरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेले. या ठिकाणी त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात आले होते.