कोल्हापूर : ईटीव्ही भारतने (Etv Bharat Impact) प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत आणि ओमायक्रोनचा (Omicron Variant) संभाव्य धोका ओळखून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राच्या सीमेवर तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश हवा असल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह (Negative RTPCR Report) असायला हवा शिवाय लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे.
संभाव्य धोका प्रशासन झाले जागे
दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नवीन कोरोना व्हेरीयंट ओमायक्रोनमुळे महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेत नवीन नियमावली जारी केली आहे. ज्याप्रमाणे कर्नाटकात प्रवेश हवा असल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच नियम आता महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास लागू केले आहेत. स्वतः कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत दोन दिवसांपूर्वी आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात आजपासून सीमेवर काही कर्मचारी तैनात केले आहेत. कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांचा आरटीपीसीआर रिपोर्ट आणि लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत का याची तपासणी करून महाराष्ट्रात सोडण्यात येत आहे. मात्र ज्या पद्धतीने कर्नाटक प्रशासन कोणत्याही परिस्थितीत रिपोर्ट नसणाऱ्या प्रवाशांना कर्नाटकमध्ये सोडत नाही. तसे कडक निर्णय महाराष्ट्रातील सीमेवर पहाण्यास मिळत नाहीत. यामध्ये सुधारणा करून तात्काळ कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.