कोल्हापूर -जिल्ह्यात आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा शिल्लक आहे, अशी बातमी ईटीव्ही भारतने प्रसारित केल्यानंतर आज (सोमवार) पालकमंत्री सतेज पाटील यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले. स्वतः पालकमंत्री सतेज पाटील यांनी रक्तदान करून या शिबिराला सुरवात केली. कोरोना प्रतिबंधक लस घेण्याआधी रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा! पालकमंत्र्यांनी शिबीर घेत केले रक्तदान
कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असून रक्तसाठा केवळ आठ दिवस पुरेल इतकाच शिल्लक राहिल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती. यामुळे पालकमंत्र्यांनी शिबीर घेत रक्तदान केले.
कोरोना लसीकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तसाठा केवळ आठ दिवस पुरेल इतकाच शिल्लक राहिल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती. त्याबाबत ईटीव्ही भारतने वृत्त प्रसारित केल्यानंतर जिल्ह्यातील रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील रक्तदान शिबिर आयोजित करून जिल्ह्यातील रक्तसाठा वाढवण्याची मोठी जबाबदारी हातात घेतली आहे.
आज जिल्हा काँग्रेस कमिटी शहर कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्या वेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी उदंड प्रतिसाद देत रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदवला. दरम्यान नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याआधी रक्तदान करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.