कोल्हापूर -पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या पंचगंगा ४४ फूट ६ इंचावरून वाहत आहे. २००५ ची पुनरावृत्ती होते काय?, याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील नदीकाठच्या अनेक गावांना महापुराचा विळखा पडला असून जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरातील कुंभारगल्ली परिसरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर पर्यायी ठिकाणी केले आहे.
जिल्ह्यातील ८४ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. अनेक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. राधानगरी धरणाच्या ४ दरवाजातून ७,११२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायत आहे. पूर परस्थितीमुळे जिल्ह्यातील २८९ कुटुंबातील १०१६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड शहरात पुराच्या पाण्याने शिरकाव केला आहे. पश्चिम घाटमाथा परिसरात ६ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज आहे.