कोल्हापूर -महानगरपालिकेत पालिका अधिकारी आणि एमआयएमच्या पदाधिकाऱ्यामध्ये चांगलाच राडा झाला. यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी एमआयएमचे प्रवक्ते प्रा. शाहिद शेख यांना चोप दिल्याने परिसरातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. घरकुल योजनेतील लाभ मिळवून देण्याच्या कारणावरून हा वाद झाला.
कोल्हापुरात महानगरपालिका अधिकारी आणि एमआयएमच्या पदाधिकाऱ्यामध्ये राडा
महानगरपालिकेत पालिकेत अधिकारी आणि एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. यावेळी अधिकाऱ्यांनी एमआयएमचे प्रवक्ते प्रा शाहिद शेख यांना चोप दिल्याने परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते.
ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयातील अधिकारी हर्षजित घाटगे आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यामध्ये घरकुल मिळण्याच्या कारणावरून गुरुवारी वादावादी झाली होती. आज एमआयएमचे कार्यकर्ते हर्षजित घाटगे यांच्या विरोधात महापालिकेत तक्रार देण्यासाठी आले होते. यावेळी महापालिका अधिकारी आणि एमआयएम कार्यकर्ते अमोरासमोर आल्यावर त्यांच्यात वादावादी झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. एमआयएमचे प्रवक्ते शाहिद शेख हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने वाद आणखीनच चिघळला. यावेळी शेख यांना जमावाने चोप दिल्याने त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी शेख यांनी काही पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला.
यावेळी महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली. सदर घटनेची माहिती हर्षजित घाटगे यांनी पोलीस ठाण्यात दिली. शिवाय शेख यांनी हर्षजित घाटगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे शहर अभियंत्यानी सांगितले.