कोल्हापूर- करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात व्हीआयपी दर्शनाला मनाई असताना शुक्रवारी एका व्हीआयपी मंत्र्याने देवदर्शन घेतले. इतकेच नाही तर हे व्हीआयपी थेट मंदिर आवारात बूट घालून आल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष, देवस्थान समितीचे कर्मचारी, पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा भाविकांनी दिला आहे.
हेही वाचा-नवरात्रोत्सव तिसरा दिवस : अंबाबाईची कौमारी मातृका रुपात पूजा
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी अनेक नियम आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे सामान्य भाविकांना दर्शनासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर भाविकांचे चप्पल आणि बूट काढण्यासाठी मंदिरापासून चारशे मीटर अंतरावर व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात ओटी नेण्यास ही बंदी आहे. इतके नियम लागू असताना शुक्रवारी मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन एका मंत्र्याला दिले.