कोल्हापूर -पॅकेज म्हणा किंवा मदत म्हणा, पण पूरग्रस्तांना आता मदतीची आणि त्यांना आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना जे म्हणायचे ते म्हणा पण मदत जाहीर करा, असे उत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
महापुराने राज्यातील अनेक जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही राज्य सरकारकडून कोणत्याही पॅकेजची घोषणा करण्यात आली नाही. याबाबत विचारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, मी पॅकेज जाहीर करणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे म्हणत फडणवीस यांना टोला लगावला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी आपण काहीही म्हणा पण लवकरात लवकर मदत जाहीर करा असे म्हंटले आहे. कोल्हापूरातील पुरस्थितीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
- अनेक समित्या महत्वाचे अहवाल देत असतात त्यावर नोडल मिनिस्ट्री बनवावी :
2019 च्या महापुरानंतर वडणेरे समिती बनवण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून महापुराला कारणीभूत असलेली कारणं आणि त्यावर काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, याबाबत अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालाचे पुढे काय झाले? याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार बदलले होते, मात्र आपत्तीच्या वेळी अशा वेळी अनेक समिती बनविण्यात येतात. त्यांच्याकडून महत्त्वाचे असे दिले जात असतात. त्या समित्यांबाबत एक 'नोडल मिनिस्ट्री' बनवली पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हंटले.
हेही वाचा -शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवावे हाच परमनंट उपाय :
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे नेण्यासाठी आम्ही यापूर्वीच एक आराखडा दिला होता. त्याला वर्ल्ड बँकेनेसुद्धा तत्वतः मान्यता दिली होती. मात्र सरकार बदलले आणि हा प्रश्न तसाच राहिला. जोपर्यंत आपण या पाण्याचा निचरा बोगद्याच्या माध्यमातून पुढे नेऊ शकत नाही तोपर्यंत आंबेवाडी, चिखली आणि इतर गावातील पुराचा प्रश्न सुटणार नाही. असेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय नदीच्या बाजूने भिंत बांधण्याबाबत एक पर्याय समोर आल्याचे बोलले जात आहे याबाबत विचारले असता हा काय पर्याय असू शकत नाही आणि ती भिंत प्रत्यक्षात संपूर्ण नदीच्या बाजूंनी घालने शक्यही नाही. अनेक पर्यायांपैकी एक पर्याय असू शकतो मात्र प्रत्यक्षात शक्य नाही असेही त्यांनी म्हटले.
- जिल्ह्यात 22 ठिकाणी उंचीवरचे ब्रिज बनवले पाहिजे :
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रिजबाबत पाठपुरावा केला होता. मात्र, याबाबत सरकारकडून दिरंगाई होत आहे. याचे कामसुद्धा लवकरात लवकर झाले पाहिजे असे सांगत महापुरामुळे जिल्ह्यात अनेक मार्ग बंद पडतात, नागरिकांचा संपर्क तुटतो अशा एकूण 22 ठिकाणी मोठे ब्रिज बनवण्याबाबतचा आराखडा बनवण्यात आला होता असे त्यांनी म्हटले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच माजी आमदार अमल महाडिक यांनी हा आराखडा दिला होता त्याबाबत सुद्धा आता विचार होणे गरजेचे असून याठिकाणी ब्रिज बनवले पाहिजेत असेही त्यांनी म्हटले. शिवाय ज्या उपयोजना शासनाकडून करण्यात येतील त्या लॉंग टर्म साठी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा -'विधानसभेचं विद्यापीठ' : जाणून घ्या, गणपतराव देशमुखांबद्दल...