कोल्हापूर - लॉकडाऊन काळामध्ये नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडलेल्या अनेक वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. ज्यांच्या गाड्या जप्त करून सात दिवसांपेक्षा जास्त अवधी झाला आहे, अशा सर्वांना त्यांच्या गाड्या पुन्हा परत दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्या गाड्या परत घेण्यासाठी आज कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या बाहेर नागरिकांनी भली मोठी रांग लावल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
सर्व कागदपत्रे तपासूनच गाड्या परत
लॉकडाऊन काळात जप्त केलेल्या गाड्या घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक वाहन धारकांच्या गाड्यांचे कागदपत्र तपासूनच त्यांना गाड्या परत दिल्या जात आहेत. शिवाय सोशल डिस्टन्सचे नियम पाळले जात आहेत. तसेच प्रत्येक वाहनधारकांना टोकन देण्यात आले असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली आहे. जवळपास दोन हजारांहून अधिक गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्या सर्वच गाड्या नागरिकांना परत दिल्या जात आहेत.