कोल्हापूर -जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा म्हणजेच रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक आहे. काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोल्हापूरचा रिकव्हरी रेट 91.04 टक्के इतका आहे. मात्र, आज (शुक्रवारी) सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार कोल्हापूरातील 750 रुग्णांपैकी 703 इतके रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेटमध्ये आणखी वाढ झाली असून, 94 टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे राज्यातील सर्वात कमी मृत्यू दर कोल्हापूरचा असून तो 1.1 इतका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर, पोलीस आणि संपूर्ण प्रशासनाने एकत्रितरित्या घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागापासून कोल्हापूर शहरापर्यंत अतिशय उत्तम प्रकारे यंत्रणा उभी करण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांची साखळी बनवली असून, एखादा रुग्ण गंभीर स्थितीत गेल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करून योग्य ते उपचार करण्यात येत आहेत.
जिल्ह्याचा डेथ रेट कमी ठेवून रिकव्हरी रेट वाढविण्यात यश मिळाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची सुद्धा या संपूर्ण यंत्रणेत मोलाची मदत होत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सर्वाधिक असल्यामुळे नागरिकांनी बेसावध राहू नये. स्वतःची काळजी घेण्याची अजूनही गरज आहे. कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे मास्क सॅनिटायझर आणि प्रशासनाकडून दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.
जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार कोल्हापूर पाठोपाठ परभणी 87.1, हिंगोली 84.9, वर्धा 78.6, गडचिरोली 78, सिंधुदुर्ग 77.3, चंद्रपूर 75.9, अहमदनगर 74.6, उस्मानाबाद 73.9 असे 9 जिल्हे 70 टक्क्यांहून अधिक रिकव्हरी रेट असणारे आहेत. तर सर्वात कमी रिकव्हरी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई 50.4, सोलापूर 46.7, नंदुरबार 43.4, ठाणे 39.3, पालघर 30.3 यांचा समावेश आहे. 30 टक्क्यांहून कमी रिकव्हरी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये वाशीम जिल्ह्याचा आहे.वाशिमचा रिकव्हरी रेट 23.9 टक्के इतका आहे.