कोल्हापूर -महाविकासआघाडी सरकारला कायदा आणि सुव्यवस्था पेक्षा कॉन्ट्रॅक्ट, टेंडर आणि पैसा महत्त्वाचा आहे. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही. लगेच जामीन मिळतो. खटला खूप वर्षे चालतो. त्यामुळे अशा प्रकारात वाढ झाली आहे. राज्य सरकारने हे सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले पाहिजेत. तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे हे पाहण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने तपासात हस्तक्षेप न करता पीडितांना न्याय मिळवून दिला पाहिजे. मुंबई साकीनाका प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी. अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आज (शनिवार) ते साकीनाका प्रकरणावरून पत्रकार परिषदेत बोलत होते.
'गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना'
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, साकीनाका परिसरात घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणावरून समाज हादरून गेला आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींना कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय धाक निर्माण होणार नाही. गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कारवाई होत नसल्याने अशा घटना मधील सराईतपणा वाढला आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
'पोलिसांवर राजकीय दबाव'
राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही. पटापट जामीन होत आहेत. हे खटले वर्षभर चालत आहेत. जर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले तर दोषींना लवकर शिक्षा मिळेल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कायद्याचा धाक निर्माण झाला होता. पोलिसांवर राजकीय दबाव असेल तर काय होणार नाही असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.