कोल्हापूर-अलीकडच्या काळात ग्रामीण भागात भाजप आपली मुळें पक्की करत आहे. भाजपच्या माध्यमातून जोडलेल्या अनेक दूध संस्था आहेत. आमचे हक्काचे सभासद आहेत, त्यामुळे सत्ताधारी गटाला भेटून भाजपला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे करतील,असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रामीण भागात भाजप विस्तारत आहे. त्यामुळे गतसाली निवडणूक भाजपने लढवली. यावेळी भाजप जिल्हा बँकेची निवडणूक ताकतीने लढवणार. हीच भूमिका गोकुळ बाबत आहे. जिल्ह्यात भाजपच्या माध्यमाद्वारे अनेक दूध संस्था जोडलेल्या आहेत. त्यामुळे भाजपची मते आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यासोबत चर्चा केली असून, गोकुळच्या निवडणुकीत भाजपचा प्रभाव असला पाहिजे या अनुषंगाने काम सुरू ठेवावे, अशी सूचना दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
गोकुळच्या निवडणूकित भाजप सत्ताधारी गटासोबत जाणार असल्याचे संकेत देत पाटील यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणारे माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक व आमदार पी.एन.पाटील यांच्याशी घाटगे चर्चा करतील. भाजपचे सभासद गोकुळमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी करतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांना टोला -
राज्य सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणावा, महाविकास आघाडी किती भक्कम आहे. हे चंद्रकांत पाटलांना कळेल. असे विधान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. त्यावर बोलताना पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. भक्कम असल्याची भाषा करता, मग विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक का नाही घेतली? असा प्रतिसवाल केला. अविश्वास ठराव करावा की नाही, हे आम्हाला कळते कधी काय करावे. घटना व राज्यपालांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून तुम्ही घटनेचा भंग केला. तुमच्याकडे १७० मते आहेत हे सिद्ध करण्याची संधी का घालवली? असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.