कोल्हापूर -ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात भाजपाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत भाजपाने हे आंदोलन केले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. ओबीसी आरक्षणावरून केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा अगोदर तुमच्यातील ओबीसी समाजाचा नेता ठरावा, मगच ओबीसी आरक्षणावर बोला. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोल्हापुरातील बिंदू चौकात खुल्या चर्चेला यावे, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी केले. दाभोळकर कॉर्नर येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनात ते बोलत होते.
'..तोपर्यंत भाजपा रस्त्यावर'
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ओबीसीचे राजकीय आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. याला राज्यसरकार जबाबदार आहे. जोपर्यंत हे आरक्षण पुन्हा मिळत नाही तोपर्यंत भाजपा रस्त्यावर उतरले, असा इशारा पाटील यांनी दिला.
'तोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार'
15 वेळा सुप्रीम कोर्टाने महाविकासआघाडी सरकारकडे इंपेरिअर डेटा द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र तो न देता केंद्राकडे बोट दाखवत आहे. इंपेरिअर डेटा हा राज्याच्या मागास आयोगाने द्यावा लागतो, केंद्राने नाही, असे पाटील म्हणाले. जोपर्यंत राज्यसरकार हा डेटा केंद्र सरकारला देत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही. असे पाटील म्हणाले.
'महाविकासआघाडी सरकारने पुड्या सोडणे बंद करावे'
ओबीसी अरक्षणावरून महाविकासआघाडी सरकारने केंद्राकडे बोट दाखवणे थांबवावे. छगन भुजबळ यांना जाहीर आव्हान देतो, त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत कोल्हापुरातल्या बिंदू चौकात जाहीर चर्चेला यावे. यात कोण-कोणाला फसवते आहे हे कळेल, महाविकासआघाडी सरकारने पुड्या सोडणे बंद करावे. 15 वेळा सुप्रीम कोर्टाने डेटा मागितला तो तुम्हाला देता आला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात हे आरक्षण टिकवून दाखवले, हे तुम्हाला का करता आले नाही, असा सवाल पाटील यांनी करत ओबीसी व मराठा समाजाचे नुकसान तुम्ही केले असा आरोप केला.