कोल्हापूर - मुश्रीफांच्या धमकीला मी घाबरत नाही. माझी संपत्ती विकली तर १०० कोटी काय? १ कोटी पण येणार नाहीत. मुश्रीफ अब्रूनुकसानीच्या दाव्यात यशस्वी झाले, तर मला स्वतःला विकावे लागेल, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या इशाऱ्याला प्रतिउत्तर देताना ते कोल्हापुरात बोलत होते.
'तर मला विकावे लागेल' -
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अब्रूनुकसानीची नोटीस काढण्याचा इशारा दिला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांचा चांगलाच समाचार घेतला. हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा खुशाल दाखल करावा, मी कोणाला घाबरत नाही. माझी सर्व संपत्ती विकली तरी शंभर कोटी काय? एक कोटी पण येणार नाहीत. मुश्रीफ जर त्यात यशस्वी झाले, तर मग मलाच विकावे लागेल असा टोलाही त्यांनी लगावला.
'शरद पवार लवकर बरे व्हावेत' -
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, की राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे लवकर बरे व्हावेत यासाठी मी करवीर निवासिनी श्री अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. ते बरे झाल्यावर त्यांनी सर्वात आगोदर कोरोना परिस्थिती आणि मराठा आरक्षण या विषयावर बोलले पाहिजे. या प्रश्नातून त्यातून मार्ग काढण्यासाठी काही सूचना केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.