महाराष्ट्र

maharashtra

राज्याचे आर्थिक, वैद्यकीय वाटोळे झाल्यावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली - भाजप नेते चंद्रकांत पाटील

By

Published : Jun 29, 2021, 3:25 PM IST

Updated : Jun 29, 2021, 5:10 PM IST

शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जी भूमिका बजावायला हवी होती, ती भूमिका बजावलेली नाही. एक अंकुश ठेवण्याची भूमिका त्यांची हवी होती, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Chandrakant Patil unhappy with Sharad Pawar
महाराष्ट्र आर्थिक वाटोळे शरद पवार

कोल्हापूर - शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करायला वेळ लावला. महाराष्ट्राचे आर्थिक आणि वैद्यकीय वाटोळे झाल्यावर ते नाराजी व्यक्त करतात. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जी भूमिका बजावायला हवी होती, ती भूमिका बजावलेली नाही. एक अंकुश ठेवण्याची भूमिका त्यांची हवी होती, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा -कर्नाटकमधील एकाच कुटुंबातील चार भाऊ बुडाले; अजूनही शोधकार्य सुरू

महाराष्ट्रातील कोरोना नियमांवरून धरसोडपणा सुरू आहे. यावरून शरद पवार नाराज आहेत. ही नाराजी घेऊन खासदार संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेत, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

102 व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्रावर केलेले आरोप चुकीचे

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारवर चुकीचे आरोप करत आहे. 102 व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्रावर केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजप मराठा आरक्षणासंदर्भात मूळ कायद्याबाबत केंद्राकडे प्रयत्न करणार असल्याचे पाटील म्हणाले. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रक्रिया राज्य सरकारलाच करावी लागेल, असे पाटील म्हणाले. राज्य सरकार दिल्लीकडे बोट दाखवत असले, तरी दिल्लीचा रस्ता मुंबईतच जातो. नवीन आयोगाने सर्व्हे करून पुन्हा मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

ज्यांच्या मागे मराठा समाज धावला, त्यांच्याकडून काय मिळाले?

मराठा समाज ज्या नेत्यांच्या गाड्यांच्या मागे धावला, त्या नेत्यांनी मराठा समाजाला काय दिले? सुरुवातीला हे कसे होते? यांची संपत्ती किती होती? आणि आता यांच्या संपत्तीत किती वाढ झाली? हे समाजानेच पहावे. मराठा समाजातील या नेत्यांनी कुण्या तरुणाला डॉक्टर केले का? इंजिनियर केले का? असा सवाल करत बंद पडणाऱ्या स्कूटरवरून फिरणाऱ्यांची आज इतकी संपत्ती कशी काय झाली? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला.

काँग्रेस बराच काळ सत्तेत होती, मग आरक्षण का दिले नाही?

काँग्रेस नेहमीच भाजपवर आरोप करते. केंद्रात आणि राज्यात बऱ्याच वेळ काँग्रेसचे सरकार होते. मग त्यांनी आरक्षण का दिले नाही? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केले आहे. मराठा समाज आरक्षणासंदर्भात नेतृत्व आम्ही करणार नाही. कारण त्याला राजकीय रंग चढेल, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

मराठा समाजासाठी भाजप आमदार सुरेश धस मैदानात

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत पुनर्विचार याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता उशिरा का होईना, भाजप आमदार सुरेश धस मराठा समाजासाठी मैदानात उतरले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमदार सुरेश धस यांनी सोमवारी (28 जून) बीड शहरात मोर्चा काढला.

'आता तरी आघाडी सरकारने भक्कमपणे बाजू मांडावी'

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आजवर अनेक मोर्चे, आंदोलने झाली आहेत. भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र, आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे आरक्षण रद्द झाले. आता पुन्हा नव्याने पुनर्विचार याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. आता तरी आघाडी सरकारने न्यायालयात मराठा समाजाच्या बाजूने भक्कमपणे भूमिका मांडून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

हेही वाचा -कोल्हापुरात व्यापारी आणि प्रशासनात संघर्ष; व्यापारी दुकाने उघडी ठेणवण्याच्या निर्णयावर ठाम

Last Updated : Jun 29, 2021, 5:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details