कोल्हापूर -कोल्हापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. रोजच 500 ते 1 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचासुद्धा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः मंत्री मुश्रीफ यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. शिवाय आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची काळजी घेऊन चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 6 आमदारांना आणि दोन खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात एकूण 3 मंत्री आहेत. त्यातील मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली असून, सर्वांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय आपली तब्येत एकदम उत्तम असून, लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन, असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.