कोल्हापूर - भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता कोल्हापुरातील मुश्रीफ समर्थक चांगलेच संतापले असून सोमैया यांच्या पुतळ्याचे अनेक ठिकाणी दहन करण्यात आले आहे. शिवाय किरीट सोमैया यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत अनेक ठिकाणी निदर्शने सुद्धा करण्यात आली. दरम्यान, मुश्रीफ यांनी सोमैया यांचा आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा -मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा? २७०० पानांचे पुरावे सोमैय्यांनी दिले आयकर विभागाला
सोमैया यांचा मुश्रीफ यांच्यावर आरोप -
सोमैया यांनी आज पत्रकार परिषद घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. तसेच मुश्रीफ यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकत्ता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरुन दिसून येते, असा आरोपही किरीट सोमैया यांनी केला आहे. या सर्व घोटाळ्यांची कागदपत्रे मी ईडी आणि आयकर विभागाला दिली असून हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांचीही चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सोमैया म्हणाले. दरम्यान, सोमैया यांच्या या आरोपानंतर मुश्रीफ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा -माझ्यावरील आरोप चुकीचे, सोमैयांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार - मंत्री मुश्रीफ