कोल्हापूर - शहरात गवळी गल्ली, बुधवार पेठ, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बागल चौक, उत्तरेश्वर रंकाळा वेश, दुधाळी या ठिकाणी पारंपरिक दुग्ध व्यावसायिक आहेत. सर्वांच्या मिळून साधारण पाच ते सात हजार म्हशी आहेत. म्हशींना रोज पाणवठ्यावर नेत स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. यापूर्वी नदीत तलावात म्हशींना सोडून दिले की काम होत असे. आता प्रदूषणामुळे त्यावर निर्बंध आणले गेले आहेत. नदीत तलावात म्हशी सोडल्यावर कारवाई सुरू झाली आहे .त्यामुळे एवढ्या म्हशी रोज धुवायच्या कोठे हा प्रश्न गंभीर ठरला आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांनी मंगळवार पेठ बेलबाग महालक्ष्मी नगर परिसरातील म्हैस पालन करण्यासाठी भविष्यातील कारवाई ओळखून "कॅटल सर्विस सेंटर दूध कट्टा व पार्लर" उभे केले आहे.
कान हलवत, अंग झटकत ही म्हैस अंगावर पडणाऱ्या पाण्याच्या धारेचा आनंद घेत आहेत. म्हशीचा मालक हातातल्या पोच्याने म्हशीचे अंग घासून स्वच्छ करत आहे. म्हशीचा काळारंगही किती ताजातवाना असतो हे म्हशीच्या त्या ओल्या अंगाकडे पहिल्या नंतर लगेच जाणवत आहे. म्हशींचे असे लाड सध्या कोल्हापुरात सुरू आहेत. दूध कट्ट्यावरचे धारोष्ण दूध आणि अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या कोल्हापुरातल्या म्हशींसाठी अशी मोफत सुविधा मंगळवार पेठेतील बागेत सुरू झाली आहे. पंचगंगा नदी, रंकाळा, कोटितीर्थ, कळंबा तलाव म्हशी धुतल्या तर तो पर्यावरणाची हानी केल्याचा गुन्हा आहे. त्यावर उपाय म्हणून बेलबागेत चक्क म्हशीसाठी शॉवर बाथ, ब्युटी पार्लर सुरू करण्यात आले आहे. कोल्हापुरातील गाई-म्हशी नदी तलावातील पाण्यात धुवू नयेत, ही यामागची भावना आहे. कोल्हापूर महापालिका व डीपीडीसीच्या माध्यमातून हा शॉवर बाथ उभा राहिला आहे.