कोल्हापूर - लॉकडाऊनकाळातील वीज बिल माफ करावीत, यामागणीसाठी आज भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कोल्हापूरकरांनी अचानक रास्तारोको करून महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारने वीज बिल माफी करावी अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराच भाजपने दिला आहे. दरम्यान यावेळी आंदोलन कर्ते व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली.
लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी करावी या मागणीसाठी भाजपकडून आज राज्यभरात आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरात देखील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर भाजपच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेने 300 युनिटपर्यंत 30 टक्के विज बिल कमी करण्याची ग्वाही वचननाम्यात दिली होती. मात्र जनतेच्या तोंडाला पाने पुसली. शिवसेनेच्या एका मंत्र्यांना वीज बिल माफ करण्याची घोषणा केली, मात्र तीन पक्षांच्या चंचल पणामुळे सर्वसामान्य वीजबिलात सवलत मिळाले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या या धोरणामुळे सर्वसामान्य जनता भरडत आहे. मागील चार ते पाच महिने जनतेला रोजगार नाही, अशा काळात देखील वीज बिल वाढवून महाविकास आघाडी सरकारने मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार केला, असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केला. जोपर्यंत राज्य सरकार वीज बिल माफ करत नाही, तोपर्यंत आम्ही वीज बिल भरणार नाही, वीज तोडणी केल्यास कोल्हापुरी हिसका दाखवू अशा शब्दात भाजपने इशारा दिला आहे.
पोलीस-आंदोलन कर्त्यामध्ये झटापट-ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन सुरू होते. परवानगी असताना आंदोलनला पोलिसांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत देखील भाजपचे आंदोलन सुरू ठेवले. मात्र त्यानंतर आंदोलन मार्गावरील वाहतूक पोलिसांनी सुरू ठेवल्याने आंदोलनकर्ते व पोलीस यांच्यात झटापट झाली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवून धरत रस्त्यावरच वीज बिलांची होळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदतलॉकडाऊन जाहीर झाल्यापासून गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला मोफत धान्य दिले. तर भाजपकडून तांदूळ, गह, तेल,डाळ व किराणा साहित्यांची वाटप केले. तसेच परप्रांतीय मजुरांना घरी सोडण्याचे काम व प्रवासातील जेवणाचा खर्च भाजपकडून करण्यात आला. मात्र तीन महिने सर्वसामान्य जनतेला रोजगार नाही, अशावेळी वीज बिल वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महा विकास आघाडी सरकारने केले असल्याची टीका भाजपचे शहर सरचिटणीस विजय जाधव यांनी केली.