कोल्हापूर : समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा, हा महा विकास आघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून त्याच्या कर्जमुक्तीच्या कागदी घोषणा करण्याचे व त्याचे खोटे श्रेय घेण्याचे प्रकार याआधी उघडकीस येऊनही विजेच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारने पुन्हा तोच खेळ मांडला. वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर ( BJP state vice president Suresh Halvankar ) यांनी केला आहे. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशा अभावी बंद नाहीत -यावेळी ते म्हणाले, राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशा अभावी बंद नसल्याचे, वीज मंडळाच्या तपशिलावरून स्पष्ट दिसत आहे. असे असताना ढिसाळ कारभार व कमाल मागणीच्या वेळी पुरेशी वीजनिर्मिती करण्यातील नियोजनाचा अभाव हीच कारणे राज्यातील वीजटंचाईला कारणीभूत आहेत. खाजगी क्षेत्राकडून महागडी वीज खरेदी करून दलालीतील टक्केवारी कमाईकरिताच हा कृत्रिम वीजटंचाईचा घाट घातला जात आहे, असेही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले.