कोल्हापूर - मराठा काय आहे आणि आपली ताकद हे दाखवायला आता पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. शिवाय एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. लॉकडाऊन संपताच या लढ्याची ठिणगी कोल्हापूर जिल्ह्यातून पेटली पाहिजे, असे राजर्षी शाहू जनक घराण्याचे वंशज तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून मराठा समाजाला भेटणार'
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक मोर्चे निघाले. लाखोंच्या संख्येने मराठा समाजातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे मी स्वतः पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले. शिवाय मी राज्यातील प्रत्येक संस्था, नागरिक, युवक, विद्यार्थ्यांशी चर्चा करून भेटणार आहे. शिवाय त्या सर्वांना एकत्र करणार असल्याचेही ते म्हणाले. गेल्या वेळी 58 मोर्चे निघाले म्हणूनच आरक्षण मिळाले होते. ते राज्य सरकारला टिकवता आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा लढा उभा करून सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेऊ असेही त्यांनी म्हंटले.