कोल्हापूर -शासकीय योजनांतून विविध व्यवसायांसाठी प्राप्त झालेले कर्ज प्रस्ताव बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दिवाळीपर्यंत निकाली काढावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या आहेत. शिवाय प्रलंबित कर्ज प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करुन घेऊन दिवाळीपर्यंत मंजूर करावे, जेणेकरून लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त व्यवसाय सुरु करता येईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते.
खरीप हंगामासाठी 1475 कोटींचे कर्ज वाटप -
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, खरीप हंगामासाठी जिल्हा अग्रणी बँकेने 1360 कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. जिल्ह्यातील सर्व बँकांनी 1475 कोटींचे कर्ज वाटप करून 108 टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल बँकांचे अभिनंदन करून रब्बी हंगामासाठी प्राप्त पीक कर्जाचे अर्ज तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व आर्थिक विकास महामंडळाकडून बँकांकडे मंजुरीसाठी पाठवलेली लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे बॅंकांनी लवकरात लवकर मंजूर करावीत. त्रुटी असणाऱ्या प्रकरणी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन प्रकरणांचा निपटारा करावा. यासाठी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, संबंधित कर्मचारी यांनी तालुकानिहाय शिबीर आयोजित करावे. तसेच सर्व प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करून बँकांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे, असेही त्यांनी म्हटले.
आर-सेटी केंद्राच्या माध्यमातून अनेकांना प्रशिक्षण -
कोल्हापूरमध्ये बचत गटांच्या महिला युवक युवतींसाठी आर-सेटी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान 4 प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले असून यामध्ये 128 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आर-सेटीच्या संचालिका सोनाली माने यांनी दिली. त्या म्हणाल्या, कोल्हापूरमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले असून या केंद्रामार्फत वेगवेगळ्या गावांमध्ये बँकींग साक्षरतेबाबत जनजागृती होण्यासाठी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. एप्रिल-मे ते सप्टेंबर 2021 अखेर वित्तीय साक्षरतेचे 23 कार्यक्रम घेण्यात आले असून यामध्ये 1 हजार 110 व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
जनधन योजनेअंतर्गत 11 लाख 61 हजार 922 खाती -
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेंतर्गत शिशु, किशोर, तरुण या योजनांमध्ये जून 2021 अखेर 24 हजार 817 लोकांना वित्तपुरवठा केला असून त्यांना 137.68 कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात 30 जून 2021 पर्यंत पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत 11 लाख 61 हजार 922 खाती उघडण्यात आली आहेत. तर 8 लाख 38 हजार 437 खात्यांमध्ये रूपे कार्ड प्रदान करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 5 लाख 48 हजार 923 खाती उघडण्यात आली आहेत, तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 2 लाख 11 हजार 396 खाती उघडण्यात आली आहेत. याबरोबरच अटल विमा योजनेअंतर्गत सन 2021 - 22 मध्ये 8 हजार 581 खाती उघडण्यात आली असल्याचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक गणेश शिंदे यांनी सांगितले. तसेच पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात पथविक्रेत्यांना कर्ज वाटपाचे काम प्रगतीपथावर असून आज पर्यंत 9 हजार 150 अर्ज मंजूर करून 8 हजार 481 खात्यांमध्ये 8.78 कोटी रक्कम वाटप केल्याचेही शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विश्वजित करंजकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवी शिवदास, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक गणेश शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके तसेच सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व सर्व महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.
हेही वाचा - पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन किरण गोसावी पसार.. महिला सहकाऱ्याला अटक