कोल्हापूर - अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वक्तव्यानंतर ब्राम्हण समाजातील लोक त्यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा नंतर मिटकरी यांच्या वक्तव्याचे समर्थन करत त्यांनी कोणत्याही धर्माविषयी बोलले नसून एका व्यवसायावर बोलले असल्याचे म्हटले. शिवाय अनेक वैदीक शाळा आहेत जिथे केवळ ब्राम्हण समाजातील लोकांनाच शिकवले जाते, आम्हाला सुद्धा येऊन शिकू द्या, असे म्हटले. मात्र, कोल्हापुरात ( Shahu Vedic School in kolhapur ) एक असे विद्यालय आहे जिथे गेल्या शंभर वर्षांपासून बहुजन समाजातील मुलांना वैदिक ( Purohit education Shahu Vedic School ) शिक्षण दिले जात आहे. स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या विद्यालयाची सुरुवात केली होती. या विद्यालयाबाबत जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून.
हेही वाचा -तारखेप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत; समन्वयकांच्या सुद्धा काही भावना आहेत : संभाजीराजे
वेदोक्त प्रकरण आणि वैदीक विद्यालयाची सुरुवात - वैदिक विद्यालयाची सुरुवात स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी केली होती. त्याला कारणही तितकेच महत्वाचे आहे, ते म्हणजे वेदोक्त प्रकरण. खरतर राजर्षी शाहू महाराज त्यांच्या सुरुवातीच्या काळात धार्मिक होते. त्यामुळेच ते प्रत्येक वेळी कार्तिक स्नानास पंचगंगा नदीच्या घाटावर जात असत. त्यावेळीच एका पुरोहिताने आपण शुद्र आहात म्हणत आपल्याला वेदमंत्राचा अधिकार नाही, असे सांगितले. हा वाद पुढे वाढतच गेला. त्यानंतर आपल्यासारख्या व्यक्तीबाबत असे होत असेल तर सर्वसामान्य बहुजनांच्या बाबतीत काय, असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यामुळेच, त्यांनी सर्व धार्मिक विधी, कृत्ये करण्यासाठी बहुजन समाजातील लोक सुद्धा तयार झाली पाहिजे, असा मुद्दा सामोर आणला आणि पुढे याच वैदिक विद्यालयाची स्थापना केली. त्याला त्यांनी शिवाजी वैदीक विद्यालय, असे नाव दिले. राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांनी पुढे श्री. शाहू वैदिक विद्यालय सुरू केले. आजही या शाळेत दरवर्षी मोठ्या संख्येने बहुजन समाजातील मुले वैदिक शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत.