मुंबई -सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल विधाने करत असून, त्यांना चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण - चंद्रकांत पाटलांवर अशोक चव्हाणांची टीका
चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षण प्रकरणासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पातळी सोडून केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. भाजपाला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपाने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने आमदार चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. मात्र, योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.