कोल्हापूर -शहरवासियांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्याहून रुग्णवाहिकेतून अवैधरित्या प्रवास करून आलेल्या कसबा बावडा येथील वृद्ध महिलेचा सलग दुसरा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. 14 दिवसानंतर घेतलेल्या पहिल्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यांनंतर आणखीन एक चाचणी होणार होती. आज सायंकाळी साडेचारच्या दरम्यान दुसरा अहवाल सुद्धा सीपीआर प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे आता महिलेचे दोन्ही अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना लवकरच घरी सोडण्या संदर्भात जाहीर करण्यात येणार आहे.
कोल्हापूरातील आणखीन एका रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह - woman's corona report negative in kolhapur
कोल्हापूरातील आणखीन एका रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. या वृद्ध महिलेचा सलग दुसरा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना कोल्हापुरातल्या बावड्यातील कोरोनाग्रस्त वृद्ध महिला २८ मार्चला साताऱ्याहून कोल्हापूरात आल्या होत्या. लॉकडाऊन असूनही त्या कोल्हापूरात कशा आल्या याबाबत चौकशी केल्यानंतर त्या एका रुग्णवाहिकेतून आल्याचे समोर आले. नोंदणीकृत रुग्णवाहिकेमधून कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या सातारा ते कोल्हापूर प्रवासी वाहतूक झाल्याचे समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याच वृद्ध महिलेचा आता सलग दुसरा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या कोल्हापुरात दोघांना कोरोनामुक्त घोषित केले आहे. कोल्हापुरातील हा तिसरा रुग्ण आहे ज्यांना कोरोनामुक्त घोषित केले आहे. दरम्यान, या महिलेला वगळून सद्या कोल्हापूरात 7 कोरोनाग्रस्त रुग्णांवर अद्यापही सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.