महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 26, 2021, 9:53 PM IST

Updated : Aug 26, 2021, 10:41 PM IST

ETV Bharat / city

कोल्हापुरातल्या विद्यार्थिनीला 41 लाखांचे पॅकेज; 'या' कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड

कोल्हापुरातल्या विद्यार्थिनीला जगप्रसिद्ध 'ॲडोब' कंपनीने 4, 5 नाही तर तब्बल 41 लाखांचे पॅकेज देऊन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून तिची निवड केली आहे.

amruta karande
अमृता कारंडे

कोल्हापूर -सध्या सर्वांचाच इंजिनिअरिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. वाढलेल्या बेरोजगार इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवर दररोजच सोशल मीडियावर अनेक खिल्ली उडवणारे मिम तसेच पोस्ट पाहायला मिळत असतात. मात्र, कोल्हापुरातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने अशा सर्वच खिल्ली उडवणाऱ्यांचे तोंड बंद केले आहे. कारण नुकतेच तिला एका जगप्रसिद्ध कंपनीने 4, 5 नाही तर तब्बल 41 लाखांचे पॅकेज देऊन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून तिची निवड केली आहे. कोण आहे ही विद्यार्थिनी आणि तिच्या या यशाबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
  • सर्वसामान्य कुटुंबातील अमृताला मिळाली 41 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी :

कोल्हापुरातल्या जवाहरनगर परिसरातील एका सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी अमृता विजयकुमार कारंडे हिची नुकतीच जगप्रसिद्ध 'ॲडोब' कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे तिला कंपनीने तब्बल 41 लाखांचे पॅकेज दिले असून, कोल्हापुरात आजपर्यंत इंजिनिअरिंग केल्यानंतर इतक्या मोठ्या पगाराची नोकरी कोणाला मिळाली नाहीये. विशेष करून आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला अशा पॅकेजची अनेक कंपन्या ऑफर देत असतात. मात्र इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला 41 लाखांचे पॅकेज दिलेले ही पहिलीच घटना असल्याचे कॉलेजचे प्राचार्य तसेच चेअरमन यांनी सांगितले आहे. नुकतेच तिला 'ॲडोब' कंपनीकडून याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.

  • 'या' स्पर्धेत उत्तम कामगिरीमुळे कंपनीकडून मिळाली इतकी मोठी ऑफर :

अमृता कारंडे सध्या कोल्हापुरातील 'केआयटी' महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत होती. नुकतेच तिने चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र, तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच 'ॲडोब' कंपनीने 'C कोडिंग' ही देशस्तरावरील अभिनव स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन अमृताची अडीच महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली होती या इंटर्नशिप दरम्यान तिला मासिक 1 लाख रुपये शिष्यवृत्तीही मिळत होती. या इंटर्नशिप दरम्यान घेण्यात आलेल्या विविध चाचणी परीक्षांमधून तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती. तिने दाखवलेली गुणवत्ता प्रमाणभूत धरून 'ॲडोब' कंपनीने तिला ही खास प्रिप्लेसमेंटची ऑफर दिली आहे. ही प्लेसमेंट देशपातळीवरील विशेष म्हणून गणली जाते. दरम्यान, अमृतासह तिच्या घरच्यांना याबाबत आनंद व्यक्त केला असून भविष्यात आपल्या देशाच्या आयटी आणि संगणकशास्त्र क्षेत्रात नवनिर्मितीसाठी योगदान देण्याचे अमृताचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले आहे.

  • अमृताचे वडील रिक्षाचालक तर आई गृहिणी :

कोल्हापुरातल्या जवाहरनगर परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातल्या अमृताचे वडील विजयकुमार कारंडे हे रिक्षा चालक असून अमृताची आई राजश्री कारंडे या गृहिणी आहेत. अमृता लहानपणापासूनच शाळेमध्ये हुशार राहिली आहे. दहावीमध्ये तिने 97 टक्के मार्क मिळवत यश प्राप्त केले होते. त्यानंतर बारावी सायन्स केल्यानंतर आई वडिलांना तिला डॉक्टर बनवायचं होते. मात्र, अमृताने आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं असल्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी येथील 'केआयटी' महाविद्यालयामध्ये बीटेक कॉम्प्युटरसाठी प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा तीची गुणवत्ता उत्तम राहिली आहे. नुकतेच तिचे तिसरे वर्ष पूर्ण झाले आहे. आता तीने चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे. अमृताच्या शिक्षणासाठी तिच्या आई वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. मात्र इंजिनिअरिंग पूर्ण नाही तोपर्यंतच अमृताला मिळालेल्या मोठ्या पगाराच्या नोकरीमुळे तिच्या आई वडिलांसाठी हा खूप मोठा आनंद आहे. त्यामुळे त्यांनी 'केआयटी' महाविद्यालयाचेसुद्धा आभार मानले आहेत.

  • 41 लाखांची ऑफर पाहून सुरुवातीला विश्वास बसला नाही :

दरम्यान, महाविद्यालयाच्या अनेक शिक्षकांसह विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांना अमृताला 41 लाखांचे पॅकेज मिळाले असल्याबाबत माहिती मिळाली तेंव्हा अनेकांना विश्वास बसला नाही. कारण यापूर्वी इतक्या मोठ्या पॅकेजची नोकरी कोणालाही ऑफर झाली नव्हती. अनेक कंपनी कॅम्पस इंटरव्ह्यू साठी येत असतात. त्यामध्ये कॉलेजमधील विद्यार्थ्यांना 2 ते 10 लाखांपर्यंतच्या पॅकेजची ऑफर मिळते. क्वचित काही विद्यार्थ्यांना 20 लाखांपर्यंत ऑफर असते. मात्र 41 लाखांच्या ऑफरमुळे अनेकांना सुखद धक्का बसला आहे. शिवाय सर्वांनीच याबाबत आनंद व्यक्त केला असून अमृताचे भरभरून कौतुक केले जात आहे. दरम्यान, आज महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जींनी, प्लेसमेंट अधिकारी डॉ. अमित सरकार, तसेच विश्वस्त आणि स्टाफ च्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला आणि तिच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या.

हेही वाचा -राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; ऑनड्युटी मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नोकरी

Last Updated : Aug 26, 2021, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details