कोल्हापूर : 'अंबामाता की जय..'चा गजर, रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, विद्युत रोषणाई फुलांनी सजलेला चांदीचा रथ, असा शाही लवाजमा. त्यात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचीच्या उत्सवमूर्तीवर फुलांचा वर्षाव. अशा मंगलमय वातावरणात रविवारी रात्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला. जोतिबा चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी हा सोहळा पार पाडतो. वर्षातून एकदा नगरवासीयांची भेट घेण्यास आलेल्या देवीच्या दर्शनाचा हा शाही सोहळा हजारो भाविकांनी आपल्या नेत्रामध्ये आठवणरूपी साठवून ठेवला. विशेष म्हणजे कोरोनामुळे दोन वर्षानंतर हा सोहळा पार पडल्याने मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. याचाच पाहूया विशेष रिपोर्ट.
अनेक वर्षांपासून रथोत्सवाची परंपरा:
कोल्हापूरमध्ये विविध उत्सवांत श्री अंबाबाईच्या रथोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. कोल्हापुरातील या रथोत्सवास जुनी परंपरा आहे. जोतिबाची मुख्य चैत्र यात्रेच्या दुसर्या दिवशी हा रथोत्सव सोहळा पार पडतो. अनेक वर्षांपासून या रथोत्सवाला सुरूवात झाली. पूर्वी रथोत्सवासाठी लाकडी रथ वापरला जात होता. अंबाबाई मंदिराची उभारणी करताना ज्या घटकांचा अभ्यास केला होता. तो रथासाठीही वापरण्यात आला आहे. मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, वाद्ये, छत्रपतींचा लवाजमा, लष्करातील जवान, शासकीय अधिकारी यांचा पूर्वी सहभाग होता. पण आता भाविकांकडूनच हा रथ ओढला जातो. यावेळी रथ ज्या मार्गावरून जाणार असतो. तो संपूर्ण मार्ग सुशोभित केला जातो. नयनरम्य रांगोळ्या काढल्या जातात शिवाय मोठ्या प्रमाणात आतषबाजीही केली जाते. रात्री साडे नऊ वाजता तोफेची सलामी देऊन या सोहळ्याला सुरुवात होते.