महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंबाबाई मंदिराच्या छतावर हजार टन वजनाचा कोबा असल्याची माहिती - अंबाबाई मंदिर स्ट्रक्चरल ऑडिट

अंबाबाई मंदिरावर जवळपास हजार टन वजनाचा कोबा असल्याची बाब समोर आली आहे. वेळोवेळी गळती बंद करण्यासाठी केलेल्या कोब्याची उंची आता 5 फूट झाल्याची माहिती आहे. अंबाबाई मंदिराच्या रचनात्मक तपासणीमधून (स्ट्रक्चरल ऑडिट) धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Dec 17, 2020, 6:24 PM IST

Updated : Dec 17, 2020, 7:26 PM IST

कोल्हापूर- गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाई मंदिरावर वेळोवेळी गळती बंद करण्यासाठी छतावर टाकण्यात आलेल्या कोब्याची उंची आता 5 फुटांपर्यंत पोहोचली आहे. जवळपास 100 ट्रक माती इतके हे वजन असून मंदिराला मोठा धोका निर्माण झाला आहे. लवकरात-लवकर हे अनावश्यक वजन काढण्याची गरज असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.

कोल्हापूर

अंबाबाई मंदिर जवळपास 1500 वर्षांपूर्वीचे आहे, असे म्हटले जाते. याबाबत अद्याप ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र, मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात गळती लागल्याचे पाहायला मिळत होते आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिराची रचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंदिराच्या छताची तपासणी काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी मंदिराची कधीही रचनात्मक तपासणी झालेली नाही. पहिल्यांदाच मंदिराची अशा प्रकारे तपासणी झाल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

अन्यथा मंदिरासाठी हे धोकादायक -

तपासणीतून मिळालेल्या माहितीनुसार वेळोवेळी मंदिरातील गळती रोखण्यासाठी टाकण्यात आलेल्या कोब्याची उंची 5 फुटांपर्यंत झाली आहे. त्याचे वजन हजार टन इतके असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून हे मंदिरासाठी अतिशय धोकादायक ठरणार आहे. मंदिर गेल्या कित्येक वर्षांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ओझे सोसत आहे. वारंवार गळतीमुळे शेवटी रचनात्मक तपासणी करण्यात आली, त्यामध्ये ही बाब समोर आली. मंदिरासाठी हे ओझे धोकादायक ठरणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले. त्यामुळे लवकरच तपासणी पूर्ण झाल्यानंतर ते काढण्याबाबत सर्व परवानग्या घेऊन त्याचे काम सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.

अंबाबाई मंदिराचे मूळ स्वरुप दृष्टीक्षेपात येणार -

मंदिरावरील हजार टन कोब्याचे ओझे काढल्यानंतर अंबाबाई मंदिराचे मूळ स्वरुप सर्वांना पाहता येणार आहे. सद्या वेळोवेळी यावर टाकण्यात आलेल्या कोब्यामुळे मूळ स्वरूप दिसत नाही. मात्र, ते काढल्यानंतर अंबाबाई मंदिराचे देखणे रूप सुद्धा आता समोर येणार असल्याचे अभियंता सुदेश देशपांडे यांनी सांगितले. मुंबईमधील स्ट्रकवेल कंपनीला अंबाबाई मंदिराच्या तपासणीचे काम देण्यात आले आहे. सद्या पहिल्या टप्प्यात मंदिराच्या छताचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर संपूर्ण मंदिराचीसुद्धा रचनात्मक तपासणी करण्यात येणार आहे.

Last Updated : Dec 17, 2020, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details