कोल्हापूर -शनिवारी कोल्हापुरातल्या प्रयाग चिखली गावातील शेतकऱ्यांना पंचगंगा नदीमध्ये मासेमारी करत असताना 'ॲलिगेटर गार' प्रजातीचा मासा जाळ्यात सापडला होता. अमेरिकेत आढळणारा मासा पंचगंगा नदीत सापडल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र हा पाळलेला मासा असून त्याला कोणी अज्ञात व्यक्तीनेच नदीमध्ये सोडला असल्याचा अंदाज कोल्हापुरातल्या मत्स्य संगोपन करणाऱ्या व्यक्तींनी केला आहे. दरम्यान, हा मासा नदी आणि तलावात सोडणे किती धोकादायक आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतात यावरचा 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट.
नदीत सापडलेला 'तो' मासा पाळलेला
कोल्हापुरातील मत्स्य संगोपन करणारे योगेश कागले आणि यशोधन जाधव 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिक केवळ शो साठी विदेशी मासे पाळतात. अनेकांच्या घरामध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि आकर्षक फिश टँक पाहायला मिळतात. या टँकमध्ये विविध प्रजातीच्या रंगीबेरंगी माशांसह 'ॲलिगेटर गार', टायगर शार्क, पिर्हाना सारख्या माशांना सुद्धा पाळले जाते. प्रयाग चिखलीतील नागरिकांना पंचगंगा नदीत सापडलेला 'ॲलिगेटर गार' हा मासा सुद्धा कोणी अज्ञात नदीमध्ये सोडला असल्याचे म्हटले आहे. एखाद्या फिश टँकमध्ये माशाचा आकार आणि वजन वाढले तर अनेकजण काही पाळलेले मासे नदी आणि तलावात सोडतात. त्यापैकीच हा एक मासा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परदेशातील मासे असे आपल्या नदीमध्ये स्थलांतरित होऊ शकत नाहीत आणि ते शक्य सुद्धा नसल्याचे त्यांनी म्हटले.
'ॲलिगेटर गार' मासा नदीत सोडणे किती धोकादायक ?
'ॲलिगेटर गार' हा मासा हिंस्र आणि आक्रमक प्रकारात मोडतो. याचे तोंड मगरीच्या तोंडासारखेच असते. त्यामुळे अचानक पाहिल्यानंतर कोणालाही ही मगर आहे की काय? अशी शंका येऊ शकते. हा मासा हिंस्त्र असल्याने इतर लहान मासे आणि त्यांच्या अंड्यांना सुद्धा भक्ष्य करत असतो. त्याची लांबी 10 ते 12 फूट आणि वजन अंदाजे 80 ते 100 किलोपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे हा मासा नदी आणि तलावामध्ये आढळला तर येथील स्थानिक माशांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. विशेष म्हणजे या माशांची पूर्ण वाढ झालीच तर मात्र माणसांसाठी सुद्धा हा मासा धोकादायक ठरू शकतो. अशी माहितीही योगेश कागले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे काही विदेशी मासे विक्री करतात. जिल्ह्यात फिश टँकमधील रंगीबेरंगी आणि आकर्षक मासे विकणारे व्यावसायिक जवळपास 80 ते 100 च्या आसपास आहेत असेही त्यांनी म्हटले.