कोल्हापूर - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरासह देवस्थान समितीच्या आखत्यारीत येणारी सर्व मंदिरे 30 एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्योतीबा चैत्र यात्रा सुद्धा रद्द करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे. शिवाय भाविकांना मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
मंगळवारपासून अंबाबाई मंदिरासह समितीच्या अखत्यारीतील सर्व मंदिरे बंद देवस्थान समितीच्या अखत्यारीत 3 हजारांहून अधिक मंदिरे
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत ३ हजाराहून अधिक मंदिरे आहेत. यामध्ये कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर शिवाय श्री क्षेत्र ज्योतिबाचे मंदिर सुद्धा येते. या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही सर्व मंदिर उद्यापासून (मंगळवार ) बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शिवाय भाविकांनीही मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.
26 एप्रिलला होणार होती चैत्र यात्रा
26 एप्रिलला ज्योतिबाची चैत्र यात्रा होणार होती. कोल्हापुरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि परराज्यातून सुद्धा या यात्रेला भाविक येत असतात. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी ज्योतिबाची चैत्र यात्रा रद्द झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने प्रत्येक रविवारचे खेटे सुद्धा बंद केले होते. मात्र, आता चैत्र यात्रा सुद्धा रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे.