कोल्हापूर -शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. कोणत्याही बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होता कामा नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये देखील टाकणार असल्याची माहिती बोंडे यांनी दिली आहे.
कृषीमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनिल बोंडे यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. कृषीमंत्री बोंडे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यांवर आले होते. यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कृषी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडला असून केंद्र आणि राज्याच्या योजनांचा 112 कोटींचे अनुदान खर्च केल्याचे सांगितले. कोल्हापूरच्या कृषी भवनला नुकतीच मंजुरी मिळाली असून कृषी भवनासाठी आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे. याची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंताग्रस्त करणाऱ्या आहेत. निसर्ग कोपला तरी आपण संघर्ष करू पण शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करू नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. असे देखील कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. पिक विम्यासंदर्भात कोणतीही ही कंपनी दोषी आढळली तर कारवाई करण्याचा इशारा कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नाही. अशा कंपन्यांना ब्लॅक लिस्ट करू, असा सज्जड इशारा देखील त्यांनी कंपन्यांना दिला आहे.