कोल्हापूर - 2019 नंतर पुन्हा एकदा लगेचच कोल्हापूरला महापुराचा फटका बसला. अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय बुडाले, तर अनेकांना आता पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेकांचे तर लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर अनेकजण आपापले व्यवसाय पुन्हा एकदा सुरू करत असून, सर्वजण स्वच्छतेच्या कामात गुंतले आहेत. तब्बल 4 ते 5 दिवस दुकाने पाण्यात असल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असून, सर्वजण मिळून पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपडत आहेत.
हेही वाचा -कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू, सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार करता येणार प्रवास
2019 मध्येही मोठे नुकसान, आताही तेच
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यापूर्वीसुद्धा काही वेळा महापूर आला आहे. 2019 साली आलेला महापूर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा महापूर म्हणून म्हंटले जात होते. त्यावेळी सुद्धा अनेकांचे व्यवसाय पाण्यात गेले. अनेकांची घरे जमीनदोस्त झाली होती. आता यावर्षीही या व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 2019 मधे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने मोठा खर्च करून व्यवसाय पुन्हा उभा केला होता. मात्र, आताही लाखो रुपयांचे नुकसान समोर पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. तर, अनेक जणांना व्यवसाय पुन्हा कसा सुरू करायचा? हा प्रश्न पडला आहे.
इलेक्ट्रॉनिक दुकानांचे मोठे नुकसान
शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, नागाळा पार्क, बापट कॅम्प, शुक्रवार पेठ आदी भागात अनेक व्यावसायिक आहेत. काही परिसरातील पाणी 3 दिवसात ओसरले, तर काही ठिकाणी एक आठवडा पाणी साचून होते. यामध्ये सर्वाधिक फटका इलेक्ट्रॉनिक, तसेच मोबाईल दुकानांना बसला आहे. दुकान पूर्णपणे पाण्याखाली बुडाल्याने एकही वस्तू वापरू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, इतर दुकानदार शक्य त्या वस्तू वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा -कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधितांच्या पुनर्वसनाची सुरुवात भेंडवडे गावापासून करुया - पालकमंत्री