कोल्हापूर -तब्बल दोन दिवस नॉटरिचेबल असणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshrisagar ) यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली अस्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकित हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतर राजेश क्षीरसागर हे नाराज होते. तसेच गेली 2 दिवस ते नॉट रीचेबल होते. मात्र, त्यांनी आज माध्यमांसमोर येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मातोश्री आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असल्याचं सांगत त्यांनी या पोटनिवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आपल्यासाठी प्रमाण आहे. मी काल ही शिवसैनिक होतो. आज ही आहे आणि उद्या ही राहिल, असे म्हटले आहे. तसेच 2024 साली कोल्हापूर उत्तर हा मतदार संघ काँग्रेसकडे नसून शिवसेनेकडे असेल आपण त्यावेळी लढू असेही त्यांनी म्हटले.
२ दिवस होते नॉट रीचेबल -
सध्या कोल्हापुरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. काँग्रेसचे कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने ही जागा रिकामी झाली होती. या नंतर येथे आता पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तर या जागेसाठी शिवसेनेचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना तिकीट मिळावे, यासाठी कार्यकर्ते आग्रही होते. कारण कोल्हापूर उत्तर हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथूनच राजेश क्षीरसागर 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2019 ला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने आता निवडणूका लागल्या आहेत. राज्यात महविकास आघाडी चे सरकार असल्याने आणि पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हे जागा काँग्रेसला देण्याचे आवाहन केले होते. यामुळे ही जागा काँग्रेसला देण्याचे मुख्यमंत्री जाहीर केले. यामुळे राजेश क्षीरसागर नाराज झाले आणि गेले 2 दिवस ते नॉट रीचेबल होते. मात्र, आज ते कोल्हापुरात दाखल झाले. आक्रमक झालेले कार्यकर्ते आज राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा समर्थन केले. तसेच कोल्हापूर उत्तरसाठी राजेश क्षीरसागर यांना तिकीट मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन केले आहे.