कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील शिनोली येथील में. श्रीराम स्टील या उच्चदाब वीज जोडणी धारक ग्राहकाने वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोटच्या सहाय्याने मीटर बंद-चालू करत लाखो युनिट विजेची चोरी केली आहे. त्यांनी तब्बल 3 लाख 40 हजार 800 युनिटची वीजचोरी केली आहे. आतापर्यंत त्याची रक्कम 63 लाख 69 हजार 250 रूपये इतकी होते. सदर वीजचोरी प्रकरणी मालक प्रल्हाद जोशी यांच्याविरोधात गडहिंग्लज पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली.
रिमोटद्वारे 63 लाखांची वीजचोरी अशी केली मीटरमध्ये छेडछाडमहावितरणच्या भरारी पथकाने 12 नोव्हेंबर 2021 रोजी शिनोली येथील में. श्रीराम स्टील या उच्चदाब वीज जोडणी धारक (750 केव्हीए मंजुर जोडभार) ग्राहकाच्या वीज मीटर व विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष तपासणी केली. या तपासणीत वीजमीटरच्या सीटी व पीटी टर्मिनल बसविण्याचे ठिकाणी मीटर फुटला असल्याचे दिसून आले. मीटर फुटलेल्या ठिकाणी चिकट द्रव्याच्या सहाय्याने फुटलेले तुकडे पुन्हा चिकटवले असल्याच्या खुणा दिसून आल्या. या मीटर तपासणीसाठी ग्राहक व पंचांच्या स्वाक्षरीने सीलबंद करण्यात आले. या मीटरची ग्राहक व पंचासमक्ष कोल्हापूरातील बापट कॅम्प स्थित मीटर तपासणी प्रयोग शाळेत तपासणी केली. तपासणी वेळी जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे रिमोट दिला. या रिमोटच्या सहाय्याने मीटरचा डिस्प्ले चालू - बंद करीत असल्याचे सांगितले. हे मीटर तपासले असता डिस्प्ले बंद पडून हे वीजमीटर 100 टक्के मंद गती होऊन वीजेच्या वापराची नोंद मीटरमध्ये होत नसल्याचे दिसून आले. या पद्धतीने ग्राहकाने वीज चोरीच्या हेतूने वीजमीटरमध्ये छेडछाड करुन रिमोट वापरला असल्याचे निदर्शनास येते. सदर वीजचोरीचा कालावधी 5 महिने 12 दिवस इतका निर्धारीत केला असून या कालावधीत 3 लाख 40 हजार 800 युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम 63 लाख 69 हजार 250 रूपये व तडजोड रक्कम 75 लाख रूपये एवढे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले आहे. त्यानुसार महावितरणने या मालकास वीजचोरी व दंडाचे बिल दिलेले आहे.
गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखलया वीजचोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार, विद्युत कायदा 2003, कलम 135 अन्वये संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश मगर, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी वर्षा जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कोरवी आणि निखिल कांबळे यांनी सहभाग घेऊन ही मोहिम यशस्वी केली.