कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 25 मार्चपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन दिवसात 23 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र आज तब्बल 195 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे तीन दिवस निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांचे प्रांत कार्यालय बंद होते. त्यामुळे आज अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, येत्या दोन दिवसात सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आत्तापर्यंत 218 उमेदवारी अर्ज दाखल
गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 25 मार्चपासून सुरुवात झाली आहे. 1 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दोन दिवसात केवळ 23 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज मात्र तब्बल 195 अर्ज दाखल झाले असून आजपर्यंत एकूण 218 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आज अनेक दिग्गज नेत्यांसह त्यांच्या मुलांनीही अर्ज दाखल केले आहेत.
सोशल डिस्टन्सचा फज्जा
एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करायला उमेदवार आल्याने यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसांपासून शासकीय सुट्टी होती त्यामुळे आज सकाळपासून अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्याचे समर्थक करवीर प्रांत ऑफिसमध्ये दाखल झाले. सगळेच उमेदवार आणि त्याचे समर्थक एकदम अर्ज दाखल करण्यासाठी आल्यामुळे त्याठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. करवीर प्रांत ऑफीस हे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आहे, असे असताना याच ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.