कोल्हापूर - जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क असून, आज त्याबाबत बैठक घेण्यात आली. कोरोना रुग्णांवर तालुकास्तरावरच उपचार होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे जिल्ह्यात दहा हजार ऑक्सिजन बेड वाढवण्याची तयारी केली आहे. त्याबरोबरच लहान मुलांना आणि पालकांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
सतेज पाटील - पालकमंत्री, कोल्हापूर हेही वाचा -ईडीची कारवाई.. भाजपचे हल्ले, शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, राज्यातील सद्य:स्थितीवर होणार चर्चा
- कोल्हापूर जिल्ह्यात बारा नवीन ऑक्सिजन प्लांट सुरू करणार -
पुढे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यातील उच्चांकी रुग्णांचा दर हा १९ हजार इतका होता. तर तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 29 हजार रुग्ण अशी शक्यता धरून प्रशासन कामाला लागले आहे. या रुग्णांवर ज्या त्या तालुक्यातच उपचार घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच ऑक्सिजन संदर्भात येणाऱ्या पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात बारा नवीन ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
- डोस घेतलेल्यांनीही सतर्क राहण्याची गरज -
नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला असेल तर सतर्क राहणे गरजेचे आहे. मात्र, पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची एक स्वतंत्र यादी तयार करून त्यांना दुसरा डोस देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक लागण होऊ शकते. त्यामुळे बालकांचे लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
- राजू शेट्टी यांना यात्रा रद्द करण्याची विनंती करणार -
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची उद्यापासून पूरग्रस्त शेतकर्यांसाठी पंचगंगा परिक्रमा यात्रा सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली जाईल. मात्र मराठवाडा, विदर्भ, सांगली, सातारा जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. याचा निश्चित आकडा काढण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यावर ठोस असा निर्णय होऊ शकतो. या बैठकीत निराशा असल्यास त्यावर चर्चा करावी. शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल. मात्र, या यात्रे संदर्भात मी त्यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना ही यात्रा रद्द करावी अशी विनंती करणार आहे. असे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.
हेही वाचा -सरकार सणांच्या नाही, कोरोनाच्या विरोधात; मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले