ठाणे- पूर्व वैमनस्यातून त्रिकुटाने केलेल्या हाणामारीत एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. ही घटना कल्याण तालुक्यातील खडवली येथील तलाठी कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. तर, त्याचे २ साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. साहिल बांगर असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर, कपिल भोईर (वय २५) असे त्रिकुटाच्या मारहाणीत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पूर्व वैमनस्यातून त्रिकुटाने केलेल्या हाणामारीत तरुणाचा खून - ठाणे कल्याण
साहिल बांगर असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर, कपिल भोईर (वय २५) असे त्रिकुटाच्या मारहाणीत खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कल्याण तालुक्यातील खडवली गावातील कुंभार पाडा परिसरात मृत कपिल भोईर कुटुंबासह राहत होता. काही दिवसांपूर्वी मृत कपिलचा याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत वाद झाला होता. त्यावेळी या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली होती. त्यामुळे कल्याण तालुका पोलिसांनी मृत कपिल भोईरसह काही जणांवर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, कपिल हा काही कामानिमित्त दोन दिवसांपूर्वी खडवली येथील तलाठी कार्यालयात गेला होता. याठिकाणी मुख्य आरोपी साहिल बांगर आणि त्याच्या तीन साथीदारांनी कपिलला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर नातेवाईकांनी गंभीर जखमी अवस्थेत कपिलला कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याघटनेमुळे संतापलेल्या भोईर कुटुंबासह नातेवाईकांनी रुग्णालयातच पोलिसांना सांगितले की, जोपर्यत आरोपींना अटक होत नाही. तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी मागणी पोलिसांकडे केल्याने काही काळ रुग्णालयाच्या परिसरात वातावरण तंग झाले होते. अखेर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून इतरही आरोपी लवकरच अटक करण्यात येतील, अशी पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत करत आहेत.