कल्याण डोंबिवली (ठाणे) -शहरामध्ये कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे आयुष्य गमावणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रतिदिन सरासरी रुग्णसंख्या पाचशे ते सहाशेने वाढत आहे. महापालिका आणि डॉक्टर्स कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र, खासगी रुग्णालयाच्या सुलतानी कारभारावर, अरेरावीवर आणि लूटालूटीवर नियंत्रण आवश्यक आहे. कोरोनाकडे कमाईची संधी नव्हे तर, मानवतेच्या सेवेची संधी म्हणून पाहण्याची गरज असून नागरिकांचा होणारा मानसिक छळ त्वरित थांबवावा, अशी एकमुखी मागणी कल्याणमधील साहित्यिक आणि कलाकारांनी केली आहे.
कल्याणमधील साहित्यिक आणि कलाकारांनी याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठवले आहे. त्याद्वारे सध्या सुरू असणाऱ्या विविध मुद्द्यांवर बोट ठेवण्यात आले आहे. यामध्ये कल्याणातील सार्वजनिक वाचनालय, राम गणेश गडकरी कट्टा, कोकण इतिहास परिषद, नाट्य परिषद, वृत्तपत्र लेखक संघ, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक संघ, संकल्प प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, सामाजिक कार्यकर्ते, निरुपणकार, कवी, लेखक, गृहिणी आदी 50 हून अधिक जणांचा समावेश आहे.
शासकीय यंत्रणा आणि महापालिकेची सद्याची यंत्रणा हे संकट थोपवण्यास अपुरे आहे, याची नागरिकांना जाणीव आहे. इथल्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कल्याण-डोंबिवलीत सुसज्ज सरकारी रुग्णालय नाही, हे वास्तव असून त्यामुळेच खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येणे, हे स्वाभाविक आहे. मात्र, खासगी रुग्णालयांकडून दोन-अडीच लाख रुपये अनामत मागणे, नंतरच उपचार सुरू करणे, रात्री-बेरात्री सावकारासारखी पैशाची मागणी करणे, औषधे इंजेक्शन्स न मिळणे, तुटवडा दाखवणे ही सर्व रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती असल्याने हा एकप्रकारे मानसिक छळ असल्याचे या साहित्यिक आणि कलाकारांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.