कल्याण (ठाणे) - कल्याण रेल्वे स्थानकात दिवसभरात लाखो प्रवासी कामानिमित्त ये-जा करत असतात. याच प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी शेकडो रिक्षा वाहतूक नियमांचा भंग करून मिळेल त्या ठिकाणी रिक्षा उभ्या करताना दिसून येत आहे. त्यामुळे शेकडो रिक्षाच्या विळख्यातून रस्ता काढताना प्रवासी, बस चालक आणि रुग्णवाहिका चालकही मेटाकुटीला आला आहे. आता या रिक्षाचालकांना वाहतूक नियमांची शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली असून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा पुन्हा अल्टीमेटम वाहतूक अधिकाऱ्याने दिला आहे. यामुळे येत्या काळात रिक्षाचालक खरच वाहतूक नियमांचे पालन करतील का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रिक्षा युनियनला राजकीय वरदहस्त
मुंबई उच्च न्यायालयाने मीटरनुसार रिक्षा भाडे आकारण्याचे आदेश एका याचिकेवर सुनावणीवेळी काही महिन्यांपूर्वी दिले आहेत. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही कल्याण डोंबिवलीत मात्र रिक्षाचालकांकडून मीटरप्रमाणे सेवा देण्यास प्रवाशांना नकार देत, अवाच्या सवा भाडे आकारण्यात येत आहे. यामुळे अनेकदा रिक्षाचालकांकडून प्रवाशांसोबत हुज्जत घालत प्रवाशांना दमदाटी आणि मारहाणही केली जाते. मात्र, सर्वच रिक्षा युनियनला राजकीय वरदहस्त असल्यामुळे रिक्षाचालकांची मनमानी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
रिक्षाचालकांची मुजोरी आजही कायम
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरासह रस्त्यावर आडव्या तिडव्या रिक्षा उभ्या करून वाहतूक कोंडी करणाऱ्या रिक्षाचालकांना आजवर अनेकदा शिस्त लावण्याचे प्रयत्न वाहतूक विभागाकडून करण्यात आले. तरीही रिक्षाचालकांची मुजोरी आजही कायम असल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईसाठी कंबर कसली आहे.