ठाणे - दक्षिण आफ्रिकेतून 22 नोव्हेंबरला डोंबिवलीत आलेल्या त्या 33 वर्षीय रुग्णाला ओमायक्रॉनची ( Omicron Variant ) लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. महाराष्ट्र राज्यातील हा पहिला रुग्ण होता. 27 नोव्हेंबरपासून हा रुग्ण केडीएमसीच्या ( KDMC) कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होता. त्याला कोणतीही लक्षण नव्हती, त्याची प्रकृती स्थिर होती. त्याची पुन्हा कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट ( RTPCR Test ) करण्यात आली. तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने या रुग्णाला बुधवारी (दि. 8) डिस्चार्ज देण्यात आला. हा देशातील पहिला रुग्ण डिस्चार्ज झाला आहे. विशेष म्हणजे बुधवारी या रुग्णाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्याने कोरोनावर मात केल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. नायजेरियातून आलेल्या उर्वरित चार कोरोनाग्रस्त रुग्णाच्या जीनोम सिक्वेन्सिंग ( Genome Sequencing ) अहवालाची अद्यापी प्रतीक्षा असल्याचे ते म्हणाले.
त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह ...
दक्षिण आफ्रिका केपटाऊनहून हा रुग्ण दुबई, दिल्ली ते मुंबई असा प्रवास करुन 22 नोव्हेंबरला डोंबिवलीत दाखल झाला होता. त्याला ताप आल्याने त्याने स्वत: जाऊन डॉक्टरकडे तपासणी केली. टेस्ट केली असता त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेने ( KDMC ) त्याची गंभीर दखल घेत 27 नोव्हेंबरला त्याला महापालिकेच्या आर्ट गॅलरीतील कोविड रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले. त्याचे नमुने जीनोम सिक्वेसिंगसाठी ( Genome sequencing ) एनआयव्हीला पाठविले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. राज्यातील हा पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण होता. त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह राज्याची धास्ती वाढली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.